गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न
आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
वाई, दि. १२ : गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत व कर्मचारी हिताचा वारसा जपत, गुरुपौर्णिमेच्या पावन दिनाच्या निमित्ताने एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक असा गुणगौरव सोहळा नुकताच कंपनी परिसरात अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला.
या कार्यक्रमात कंपनीतील कामगार, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांच्या मुला-मुलींनी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले एकूण ४८ विद्यार्थ्यांचा कंपनीच्या वतीने बॅग व पेन देऊन विशेष गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे प्रेसिडेंट श्री. विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट श्री. अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर श्री. युवराज थोरात, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट श्री. विवेक देशपांडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय म्हस्के आणि जनरल सेक्रेटरी श्री. अर्जुन सावंत या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी म्हणाले, "यशाचे हे पहिले पाऊल आहे, पण यश ही एक प्रक्रिया आहे, अंतिम टप्पा नाही. आपल्या पालकांच्या संघर्षांची जाण ठेवा. त्यांनी झिजून, कष्ट करून तुमच्यासाठी स्वप्न रंगवली आहेत. आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त अभ्यासात हुशार असून भागत नाही, तर एक चांगली व्यक्ती बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर प्रामाणिकपणा, सहकार्य, संयम आणि कृतज्ञता ही मूल्यं जोपासा. आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता आणि आत्मविश्वास असेल, तर तुम्ही कोणतीही उंची गाठू शकता. गरवारे कंपनी केवळ उत्पादनातच नाही तर माणूस घडवण्यातही अग्रणी राहील."
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने श्रावणी जाधव, शंतनू जगताप व शिवराज धुमाळ यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागे शिक्षकांचे, पालकांचे आणि कंपनीचे योगदान किती मोलाचे आहे, हे अधोरेखित केले. तसेच पालकांच्या वतीने गजानन जाधव, दादासाहेब काळे आणि हणमंत ढवळे यांनी आपल्या मनोगतातून गरवारे कंपनीच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत, कंपनीने घेतलेल्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कुमार पवार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या हेतू आणि गरज स्पष्ट केली.
अंशुमन जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राजक्ता कानिटकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन फडके, सुनिल पानसे, अविनाश भोसले, अशोक फापळे, महेश पवार, अक्षय शिंदे आणि आकाश धनवे यांनी विशेष मेहनत घेतली.
गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेले हे सन्मानचिन्ह केवळ एक भेटवस्तू नव्हे, तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल. समाजात शिक्षणाबरोबर संस्कार, संस्कृती आणि सामूहिक विकासाचे मूल्य जोपासणाऱ्या अशा उपक्रमांचे गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीकडून सातत्याने आयोजन होत राहो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!